या गाण्यांची, गज़लांची ....मज़ा लुटूया !

सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

दर्द मिन्नतकश-ए-दवा........ग़ालीब..

मिर्झा ग़ालीब
वेदनांचे फायदे अनेक, त्यात ह्रदयाला हात घालणारे काव्य निर्माण होते. त्या काव्यामधल्या भावना तीव्र असतात. पण त्याचा त्रास अवर्णीयच असतो. या वेदनांतून सुटण्याची धडपड कोण नाही करत ? ग़ालीब म्हणतो
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा
मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.
माझ्या वेदनांवर औषध देऊन माझ्यावर उपकार कर म्हणून मी कळवळून सांगतोय पण नाही मिळाले ! आता माझे मन अशा अवस्थेला पोहोचले आहे की ते आनंदीही नाही आणि दु:खीही नाही. ही अवस्था सगळ्यात वाईट. धड इकडे नाही आणि तिकडेही नाही. एखाद्या विशाल जलसागरात जर आपली नाव अचानक थांबली तर कशी अवस्था होईल ? तशी ! (मिन्न्ताकश-ए-दवा: औषध घ्यायलाच पाहिजे असा)

माणूस एकटा असताना जसे वागतो तसे तो दुसर्‍याच्या संगतीत कधीच वागू शकत नाही. दोन माणसे एकत्र आली की संवाद / विसंवाद चालू होणारच. तसेच दोन प्रेमिकांमधे होत असणार. पण तक्रार करणे वेगळे आणि अपमान करणे वेगळे.
ग़ालीब म्हणतो -
जमा करते हो क्यु रक़ीबोंको
इक तमाशा हुआ, गिला न हुआ.
एक तर तू मी असताना तुझ्या अनेक चाहत्यांना तुझ्या भोवती गोळा करतेस आणि त्यांच्या समोर माझ्या तक्रारी मांडतेस. ही काही तक्रार करण्याची पध्दत झाली का ? हा तर तमाशाच झाला. ( रक़ीब: प्रेमाचे प्रतिस्पर्धी, जे नुसते तिच्या सौंदर्यातच फक्त रस घेतात. )

प्रेमात काय नशीब आजमावयाचे असते का ? आपण त्यात पडतो.. पण मग तिच्याकडून आशा निराशेचे खेळ चालू होतात.
ग़ालीब म्हणतो-
हम कहां किस्मत आज़माने जाएं
तु ही जब ख़ंजर आज़मा न हुआ
आम्ही काय आमचे नशीब आजमावायला बाहेर कुठे जाणार ? पण आमच्या नशिबात जर असेल तर तुझ्या नजरेचे खंजीर आमच्यावर चालुदेत !

आपल्या प्रियतमेकडून कितीही कटू शब्द ऐकायला लागले तर आपण काय करतो ? खरंतर आपण प्रेमात पडल्यावर ते शब्द आपल्याला कडवट वाटतच नाहीत.
ग़ालीब म्हणतो -
कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब
गालिया खाके बेमज़ा ना हुआ
किती मधाळ आणि गोड आहेत तुझे हे ओठ, त्यातून येणार्‍या अपशब्दामुळे आम्हाला आजिबात राग येत नाही. आमचे जाउदेत ! आमचे तर तुझ्यावर प्रेम आहे. पाहिजे तर हे तू तुझ्या भोवती जमा झालेल्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही विचारू शकतेस ! त्यांचीही तीच गत आहे.

पण माणसाचे दुर्दैव त्याच्या प्रेमात पाठ सोडत नाही हेच खरे. एवढे प्रयत्न करून, धडपडून आपण तिच्या नजरेत रहायचे प्रयत्न करतो, तिच्या शिव्याशाप ऐकुनही तिच्यावर प्रेम करत रहातो, पण जेव्हा तिला भेटण्याची वेळ येते तेव्हा... आपले नशिबच आडवे येते. ती जेव्हा भेटते तेव्हा तोंडातून शब्द फुटत नाहीत, जरा शांत राहीले तर हे सगळे सुचेल ना ! पण आमच्यावर इकडे विज कोसळलेली असते आणि जमिनीचा आधार सुटलेला असतो.
ग़ालीब म्हणतो -
है ख़बर गर्म उनके आने की
आज ही घर में बोरिया न हुआ.
आम्हाला बातमी मिळाली आहे की तिचे पाय आमच्या घराला लागणार आहेत. ( ह्रदयात ) पण बघा आमचे नशिब किती दरिद्री आहे, आज तिला बसायला द्यायला आमच्या कडे साधे जाजमही नाही. (ह्रदयात वेगळीच खळबळ उडाली आहे)

नमरूद म्हणजे असा राजा की जो आपलच म्हणणं खरं करतो. म्हणजे आपल्यावर, आपल्या विचारांवर हा एक प्रकारचा जुलूमच असतो, नाही का ?
ग़ालीब म्हणतो-
क्या वो नमरूद की खुदाई थी
बंदगी मे मेरा भला ना हुआ.
काय हा त्या सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराचा चांगुलपणा म्हणायचा की त्याच्या पुजेतसुध्दा आमचे भले झाले नाही, होत नाही .

पण शेवटी हा जीव त्या परमेश्वराचीच देणगी आहे. ती त्याची त्यालाच परत करायला हवी. पण आमच्या हक्काचे काय ?
ग़ालीब म्हणतो-
जान दी, दी हुई उसी की थी
हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ
त्याने आम्हाला हाच हक्क दिला आहे की त्यानुसार, त्याच्या आज्ञेनुसार, आम्हाला आमचा हक्कही मिळत नाही.

या जगात ह्रदयांवर झालेल्या जखमा भळभळ वहात असतात. त्या प्रत्येकजण दाबून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याने होते काय ?
ग़ालीब म्हणतो -
ज़ख्म गर दब गया लहू ना थमा
काम गर रुक गया रवा ना हुआ.
या जख्मा आम्ही जेवढ्या दाबून टाकायचा प्रयत्न करतो तेवढ्याच जास्त त्या उघड्या होतात आणि वहायला लागतात. उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या सारखेच.

पण काय गंमत आहे बघा हे असले ह्रदय सुध्दा आमचे रहात नाही. त्यावरही ती हक्क सांगते. 
ग़ालीब म्हणतो-
रहज़नी है की दिलसितानी है
लेके दिल, दिलसितां रवाना हुआ.
काय म्हणावे त्यांना ज्यांनी आमचे हे ह्रदय चोरले आहे ? या प्रेमाच्या वाटेवरचे दरोडेखोर का हे ह्रदय चोरणारी....

हे एवढे होऊनसुध्दा आपण आपली कहाणी सांगायचे थांबत नाही. लोकांना त्या दर्दभर्‍या कहाण्यातच जास्त रस आहे. त्याच कहाण्या त्यांना ऐकायला आवडतात.
ग़ालीब म्हणतो-
कुछ तो पढ़िये के लोग कहते है
आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ.
आज लोक मला आग्रह करतात की हे ग़ालीब अजून ऐकव आम्हाला तुझी ग़ज़ल, पण खरं सांगायचे तर आज मी गप्प आहे कारण माझी ग़ज़ल मला सोडून गेली आहे. तिला आता माझ्या ह्रदयात जागा राहिली नाही. तिने इथला मुक्काम हलवला आहे....

मुळ ग़ज़ल
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा
मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.

जमा करते हो क्यु रक़ीबोंको
इक तमाशा हुआ, गिला न हुआ.

हम कहां किस्मत आज़माने जाएं
तु ही जब ख़ंजर आज़मा न हुआ

कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब
गालिया खाके बेमज़ा ना हुआ

है ख़बर गर्म उनके आने की
आज ही घर में बोरिया न हुआ.

क्या वो नमरूद की खुदाई थी
बंदगी मे मेरा भला ना हुआ.

जान दी, दी हुई उसी की थी
हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

जान दी, दी हुई उसी की थी
हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

ज़ख्म गर दब गया लहू ना थमा
काम गर रुक गया रवा ना हुआ.

रहज़नी है की दिलसितानी है
लेके दिल, दिलसितां रवाना हुआ.

कुछ तो पढ़िये के लोग कहते है
आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ.

भावार्थ : मला भावला तसा.
जयंत कुलकर्णी


स्वर्गवासी रफ़ी साहेबांनी गायलेली काही कडवी ऐका येथे –
 
आणि पूर्ण ग़ज़ल ऐका तेवढ्य़ाच समर्थ आवाजात येथे -
 

जयंत कुलकर्णी