या गाण्यांची, गज़लांची ....मज़ा लुटूया !

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०१०

वेदना आणि गाणी

मित्रहो,
एका अत्यंत मनस्वी कवयित्रीची ही कविता.
There was a pain
I inhaled it
Quietly
Like a cigarette
Left behind are a few songs
I have flickered off
Like ashes
From the cigarette.
- अमृता प्रीतम


वेदनांचा
श्वास
शांतपणे
घेतला मी,
सिगारेटचा धूर जणू.
उरली काही गाणी
झटकली मी
सिगारेट्ची
राख जणू


- भाषांतर- मी - फार पूर्वी.

शनिवार, २ ऑक्टोबर, २०१०

मित्रहो,

आज आपण ग़ालीबच्या आणखी एका ग़ज़लेचा आनंद घेणार आहोत. मला तरी ही समजायला जरा अवघडच गेली. बघा आपल्याला काही वेगळा / बरोबर / आणखी चांगला अर्थ काढता येतो आहे का ?

दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ
है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ
या हल्लीच्या काळात प्रेमातील विश्वासाचा जो अर्थ काढला जातो त्याने व तो का काढला जातो, याने काही मनाचे समाधान होत नाही.
हाच तो शब्द आहे ज्याचा खरा अर्थ काढता काढता अनेकांची दमछाक झाली आणि त्यांनी शरमेने मान खाली घातली.

या काळात प्रामाणिकपणाचा नकाशा काढायचा/चित्र/अर्थ सांगायचा बराच प्रयत्न झाला पण त्याने काही आमचे समाधान झाले नाही.
हाच तो शब्द आहे ज्याचे चित्र काढता काढता त्या थोर चित्रकाराचीही मान खाली गेली.
दहर : काळ, नक्शे-वफा : विश्वासाचे चित्र, तसल्ली : आराम वाटणे, समाधान वाटणे, मानी : थोर चित्रकार.

सब्ज़ा-ए-ख़त से तेरा काकूले सरकश न दबा
ये ज़मुर्रद भी हरीफ़े-दमें-अफ़ई न हुआ.
पाचूच्या तेजापुढे नागाची दृष्टी जाते असे म्हणतात. त्यांची तुलनाच होऊ शकत नाही. पण इथे उलटेच आहे. तुझ्या गालावर रुळणार्‍या नागासारख्या बटांवर तुझ्या पाचूसारख्या ओठांच्या महिरपीचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही. ते (बंडखोर) आपले सारखे गालावर रुळतच आहेत आणि (आम्हाला वेड लावत आहेत).
स्बज़ा – हा शब्द हिरवा रंग दाखवतो.
काकुले – कुरळ्या केसांची बट
सरकश – बंडखोर
हरिफ़ – प्रतिस्पर्धी
अफ़ई – नाग/साप


मैने चाहा था कि अंदोहे वफ़ा से छूटू
वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ.
माझी खूप इच्छा होती त्या क्लेशकारक प्रेमातून सुटण्याची, त्यासाठी माझी मरणसुध्दा पत्करायची तयारी होती.
पण हाय ! ती मला मरूही देत नाही (आणि जगूही देत नाही.)

दिल गुज़रगाह-ख़याले-मय-ओ-साग़र ही सही
गर नफ़स जादा-ए-सरमंज़िले-तक्वी न हुआ.
या आयुष्याच्या विशाल वाटेवर माझे मन हे या दुनियेतील मोहांनी भरलेले असेलही...
पण आता या क्षणी या पायवाटेवर मला माझ्या इच्छा आकांक्षांचाही आधार नाही. मला हे सगळे फोल वाटते आहे.
गुज़रगाह : रस्ता
मय-ओ-सागर : मोहमयी दुनिया
नफ़स : क्षण
ज़ादाह : पायवाट

हूं तेरे वादा न करने में भी राज़ी, कि कभी
गोश मिन्नतकशे-गुलबांगे-तसल्ली न हुआ.
तू ना आमच्याशी कधी बोललीस ना कधी वादा केलास पण ते ठीकच झाले. तुझ्या या नाजूक फुलासारख्या ओठातून काही शब्द आमच्यासाठी उमटले असते तर ते आमच्यावर उपकारच झाले असते. पण तेवढे कुठले आमचे नशीब ?
गोश : कान
मिन्नतकश : उपकारित
गुलबांग : फुलासारख्या ओठातून हाक मारणे.
तसल्ली : समाधान

किससे महरुमि-ए-किस्मत की शिकायत किजे
हमने चाहा था कि मर जाए, सो वो भी न हुआ.
आमच्या नशिबाने आमची जी आयुष्यभर निराशा केली त्याची तक्रार कुठे करायची ?
आम्ही तर त्याला कंटाळून मरायची तयारी केली होती, पण हाय तिथेही नशिबाने आमची निराशाच केली.
महरूमि : निराशा.

मर गया सदमा-ए-यक जुंबिशे-लब से ग़ालिब
नातवानी से हरिफ़े-दमे-ईसा न हुआ.
त्या मोहक ओठांच्या हालचालींनी आम्हाला अशी एक ठेच पोहोचली की जणूकाही आमचा मृत्यूच ओढवला.
ज्या येशूने अनेक मरणोन्मुख माणसांना पुनरुज्जीवन दिले त्याचाही आमच्या केसमधे पराभव झाला.
किंवा
मेलेल्या माणसांना येशू एका फुंकरीने जिवंत करतात असे म्हणतात,
पण आमच्या या प्रेमरोगात ज्यात आम्ही आमच्या प्रतिस्पर्ध्यांमुळे मागे पडलो, त्यात येशूचेही काही चालले नाही.
सदमा : ठेच
नातवानी : अशक्त, मरणोन्मूख
इसा : येशू

पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक
आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.
वरती “त्यानी” आमचे भविष्य लिहायचे आणि आमचे सगळे त्याप्रमाणे व्हायचे.... असे नसते तर आमच्याही शब्दांना काही धार होती......
तहरीर : अक्षर, शब्द, लिखाण...

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता.
पण त्याने हे लक्षात ठेवावे....
काही नव्हते तेव्हा “तो” होता,
काहीच नसले तरीही “तो” असतोच असे म्हणतात.
मी इथे अडकलो आहे म्हणून या सगळ्या गमजा आहेत, मी नसतोच तर काय “तो” असता ? आणि काय काय असतं ? उत्तर आहे “काहीच नाही.”

पूर्ण ग़ज़ल आपल्यासाठी -

दहर में नक़्शे-वफ़ा, वजहे-तसल्ली न हुआ
है ये वो लफ़्ज कि शर्मिंदा-ए मानी न हुआ

सब्ज़ा-ए-ख़त से तेरा काकूले सरकश न दबा
ये ज़मुर्रद भी हरीफ़े-दमें-अफ़ई न हुआ.

मैने चाहा था कि अंदोहे वफ़ा से छूटू
वो सितमगर मेरे मरने पे भी राज़ी न हुआ.


दिल गुज़रगाह-ख़याले-मय-ओ-साग़र ही सही
गर नफ़स जादा-ए-सरमंज़िले-तक्वी न हुआ.

हूं तेरे वादा न करने में भी राज़ी, कि कभी
गोश मिन्नतकशे-गुलबांगे-तसल्ली न हुआ.

किससे महरुमि-ए-किस्मत की शिकायत किजे
हमने चाहा था कि मर जाए, सो वो भी न हुआ.

मर गया सदमा-ए-यक जुंबिशे-लब से ग़ालिब
नातवानी से हरिफ़े-दमे-ईसा न हुआ.

पकड़े जाते है फ़रिश्तों के लिखे पर नाहक
आदमी कोई हमारा, दमें-तहरीर भी था.

न था कुछ, तो खुदा था, कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझको होने ने, न होता मै तो क्या होता.

ऐका येथे –
       


बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

अंदेशा

हर क़दम पे रहा ये अंदेशा
पीछे क़ातील है या मेरा साया....
.........................जमील कलीमी.
प्रत्येक पावलाला होती मनात हीच भिती
मागे कोण आहे मृत्यू का सावली.............
जयंत.

सोमवार, १६ ऑगस्ट, २०१०

दर्द मिन्नतकश-ए-दवा........ग़ालीब..

मिर्झा ग़ालीब
वेदनांचे फायदे अनेक, त्यात ह्रदयाला हात घालणारे काव्य निर्माण होते. त्या काव्यामधल्या भावना तीव्र असतात. पण त्याचा त्रास अवर्णीयच असतो. या वेदनांतून सुटण्याची धडपड कोण नाही करत ? ग़ालीब म्हणतो
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा
मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.
माझ्या वेदनांवर औषध देऊन माझ्यावर उपकार कर म्हणून मी कळवळून सांगतोय पण नाही मिळाले ! आता माझे मन अशा अवस्थेला पोहोचले आहे की ते आनंदीही नाही आणि दु:खीही नाही. ही अवस्था सगळ्यात वाईट. धड इकडे नाही आणि तिकडेही नाही. एखाद्या विशाल जलसागरात जर आपली नाव अचानक थांबली तर कशी अवस्था होईल ? तशी ! (मिन्न्ताकश-ए-दवा: औषध घ्यायलाच पाहिजे असा)

माणूस एकटा असताना जसे वागतो तसे तो दुसर्‍याच्या संगतीत कधीच वागू शकत नाही. दोन माणसे एकत्र आली की संवाद / विसंवाद चालू होणारच. तसेच दोन प्रेमिकांमधे होत असणार. पण तक्रार करणे वेगळे आणि अपमान करणे वेगळे.
ग़ालीब म्हणतो -
जमा करते हो क्यु रक़ीबोंको
इक तमाशा हुआ, गिला न हुआ.
एक तर तू मी असताना तुझ्या अनेक चाहत्यांना तुझ्या भोवती गोळा करतेस आणि त्यांच्या समोर माझ्या तक्रारी मांडतेस. ही काही तक्रार करण्याची पध्दत झाली का ? हा तर तमाशाच झाला. ( रक़ीब: प्रेमाचे प्रतिस्पर्धी, जे नुसते तिच्या सौंदर्यातच फक्त रस घेतात. )

प्रेमात काय नशीब आजमावयाचे असते का ? आपण त्यात पडतो.. पण मग तिच्याकडून आशा निराशेचे खेळ चालू होतात.
ग़ालीब म्हणतो-
हम कहां किस्मत आज़माने जाएं
तु ही जब ख़ंजर आज़मा न हुआ
आम्ही काय आमचे नशीब आजमावायला बाहेर कुठे जाणार ? पण आमच्या नशिबात जर असेल तर तुझ्या नजरेचे खंजीर आमच्यावर चालुदेत !

आपल्या प्रियतमेकडून कितीही कटू शब्द ऐकायला लागले तर आपण काय करतो ? खरंतर आपण प्रेमात पडल्यावर ते शब्द आपल्याला कडवट वाटतच नाहीत.
ग़ालीब म्हणतो -
कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब
गालिया खाके बेमज़ा ना हुआ
किती मधाळ आणि गोड आहेत तुझे हे ओठ, त्यातून येणार्‍या अपशब्दामुळे आम्हाला आजिबात राग येत नाही. आमचे जाउदेत ! आमचे तर तुझ्यावर प्रेम आहे. पाहिजे तर हे तू तुझ्या भोवती जमा झालेल्या आमच्या प्रतिस्पर्ध्यांनाही विचारू शकतेस ! त्यांचीही तीच गत आहे.

पण माणसाचे दुर्दैव त्याच्या प्रेमात पाठ सोडत नाही हेच खरे. एवढे प्रयत्न करून, धडपडून आपण तिच्या नजरेत रहायचे प्रयत्न करतो, तिच्या शिव्याशाप ऐकुनही तिच्यावर प्रेम करत रहातो, पण जेव्हा तिला भेटण्याची वेळ येते तेव्हा... आपले नशिबच आडवे येते. ती जेव्हा भेटते तेव्हा तोंडातून शब्द फुटत नाहीत, जरा शांत राहीले तर हे सगळे सुचेल ना ! पण आमच्यावर इकडे विज कोसळलेली असते आणि जमिनीचा आधार सुटलेला असतो.
ग़ालीब म्हणतो -
है ख़बर गर्म उनके आने की
आज ही घर में बोरिया न हुआ.
आम्हाला बातमी मिळाली आहे की तिचे पाय आमच्या घराला लागणार आहेत. ( ह्रदयात ) पण बघा आमचे नशिब किती दरिद्री आहे, आज तिला बसायला द्यायला आमच्या कडे साधे जाजमही नाही. (ह्रदयात वेगळीच खळबळ उडाली आहे)

नमरूद म्हणजे असा राजा की जो आपलच म्हणणं खरं करतो. म्हणजे आपल्यावर, आपल्या विचारांवर हा एक प्रकारचा जुलूमच असतो, नाही का ?
ग़ालीब म्हणतो-
क्या वो नमरूद की खुदाई थी
बंदगी मे मेरा भला ना हुआ.
काय हा त्या सर्वश्रेष्ठ अशा परमेश्वराचा चांगुलपणा म्हणायचा की त्याच्या पुजेतसुध्दा आमचे भले झाले नाही, होत नाही .

पण शेवटी हा जीव त्या परमेश्वराचीच देणगी आहे. ती त्याची त्यालाच परत करायला हवी. पण आमच्या हक्काचे काय ?
ग़ालीब म्हणतो-
जान दी, दी हुई उसी की थी
हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ
त्याने आम्हाला हाच हक्क दिला आहे की त्यानुसार, त्याच्या आज्ञेनुसार, आम्हाला आमचा हक्कही मिळत नाही.

या जगात ह्रदयांवर झालेल्या जखमा भळभळ वहात असतात. त्या प्रत्येकजण दाबून टाकायचा प्रयत्न करत असतो. पण त्याने होते काय ?
ग़ालीब म्हणतो -
ज़ख्म गर दब गया लहू ना थमा
काम गर रुक गया रवा ना हुआ.
या जख्मा आम्ही जेवढ्या दाबून टाकायचा प्रयत्न करतो तेवढ्याच जास्त त्या उघड्या होतात आणि वहायला लागतात. उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या सारखेच.

पण काय गंमत आहे बघा हे असले ह्रदय सुध्दा आमचे रहात नाही. त्यावरही ती हक्क सांगते. 
ग़ालीब म्हणतो-
रहज़नी है की दिलसितानी है
लेके दिल, दिलसितां रवाना हुआ.
काय म्हणावे त्यांना ज्यांनी आमचे हे ह्रदय चोरले आहे ? या प्रेमाच्या वाटेवरचे दरोडेखोर का हे ह्रदय चोरणारी....

हे एवढे होऊनसुध्दा आपण आपली कहाणी सांगायचे थांबत नाही. लोकांना त्या दर्दभर्‍या कहाण्यातच जास्त रस आहे. त्याच कहाण्या त्यांना ऐकायला आवडतात.
ग़ालीब म्हणतो-
कुछ तो पढ़िये के लोग कहते है
आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ.
आज लोक मला आग्रह करतात की हे ग़ालीब अजून ऐकव आम्हाला तुझी ग़ज़ल, पण खरं सांगायचे तर आज मी गप्प आहे कारण माझी ग़ज़ल मला सोडून गेली आहे. तिला आता माझ्या ह्रदयात जागा राहिली नाही. तिने इथला मुक्काम हलवला आहे....

मुळ ग़ज़ल
दर्द मिन्नतकश-ए-दवा न हुवा
मै ना अच्छा हुआ, बुरा न हुआ.

जमा करते हो क्यु रक़ीबोंको
इक तमाशा हुआ, गिला न हुआ.

हम कहां किस्मत आज़माने जाएं
तु ही जब ख़ंजर आज़मा न हुआ

कितने शीरीं है तेरे लब, के रक़ीब
गालिया खाके बेमज़ा ना हुआ

है ख़बर गर्म उनके आने की
आज ही घर में बोरिया न हुआ.

क्या वो नमरूद की खुदाई थी
बंदगी मे मेरा भला ना हुआ.

जान दी, दी हुई उसी की थी
हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

जान दी, दी हुई उसी की थी
हक़ तो युं है के हक़ अदा ना हुआ

ज़ख्म गर दब गया लहू ना थमा
काम गर रुक गया रवा ना हुआ.

रहज़नी है की दिलसितानी है
लेके दिल, दिलसितां रवाना हुआ.

कुछ तो पढ़िये के लोग कहते है
आज ग़ालिब ग़ज़ल सरा ना हुआ.

भावार्थ : मला भावला तसा.
जयंत कुलकर्णी


स्वर्गवासी रफ़ी साहेबांनी गायलेली काही कडवी ऐका येथे –
 
आणि पूर्ण ग़ज़ल ऐका तेवढ्य़ाच समर्थ आवाजात येथे -
 

जयंत कुलकर्णी

बुधवार, १४ जुलै, २०१०

तिने आमच्यावर स्वत:च्या अदाने नजरेचे खंजीर चालवले आणि गरीब बिचार्‍या म्रृत्यूवर आळ घेतला.......मिर्झा महम्मद हसन ( कातिल )

मित्रहो,

आज एका फ़ार्सी भाषेतली गज़लेचा आनंद लुटूया. मी खाली अर्थ दिलेला आहेच आणि सैगल साहेबांचे गाणे पण दिले आहे. वाचून झाल्यावर हे गाणे पुढे ठेवून ते गाणे जरूर ऐका आणि त्याचा आनंद घ्या.

सध्याच्या वादग्रस्त वातावरणात तेवढीच जरा करमणूक ! मन हलके करा जरा आणि आपल्या प्रेयसीला/हिला वाचून दाखवा ही गज़ल !:-)

मा रा ब-घम्ज़ा् कुश्त्-ओ-कज़ा रा बहान साख़्त्
खुद सू-ए-मा ना दीद्‍-ओ-हया रा बहान साख्त्

तिने आमच्यावर स्वत:च्या अदाने नजरेचे खंजीर चालवले आणि मी मरायला टेकल्यावर गरीब बिचार्‍या म्रृत्यूवर आळ घेतला.
माझ्याकडे बघितलेही नाही पण आव तर असा आणला की “मी लाजून बघितले नाही तुझ्याकडे”

रफ्तम् ब मस्जिदे के ब-बीनम् ज़माल-ए-दोस्त्
द्स्ते ब-रूख् कशीद-ओ-दुआ रा बहान साख़्त्

आता हीचा चेहेरा ज्याने आम्हाला वेड लावले आहे त्याचे दर्शन घ्यायचे कसे? मग आम्ही एक क्लुप्ती लढवली.
आमच्या या प्रेयसीच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला मशिदी सारखी जागा कुठे असणार ? ती प्रार्थना करेल आणि आम्ही तिच्या मुखाचं दर्शन घेत राहू. पण एवढे कुठले आमचे नशिब ? हाय ! तिने तर आपले मुखकमल आपल्या हाताच्या ओंजळीत झाकून घेतले आणि दुआ मागण्याचा बहाणा केला.

द्स्ते ब दोश्-ए-गैर निहाद अ़ज् सर्-ए-करम्
मा रा चूं दिद् ओ लघ्ज़िश्-ए-पा रा बहान साख़्त्

आता मात्र कमाल झाली. बघा कसा तिने माझ्या प्रतिस्पर्ध्याच्या खांद्यावर हात ठेवलाय. माझ्याकडे नजरही न टाकणारी ती, त्याच्यावर एवढी कृपादृष्टी कशी काय बुवा ?
तेवढ्यात आमची नजरानजर झाली आणि बघा आता - तिचा तोल गेल्यामुळे कोणाचातरी आधार घेतल्याचा बहाणा.

जाहद् न दाश्त् ताब्-ए-जमाल्-ए-परी रूखान्
कुन्जे गिरफ्त्-ओ-याद-ए-ख़ुदा रा बहान साख़्त्

या आमच्या धर्मगुरूंबद्दल माझा आदर हे पाहून अधिकच वाढला की या एवढ्या सुंदरी इथे हजर असताना हे आपल्या मनावर कसा काय ताबा ठेऊ शकतात ? अरेरे! अरे देवा काय बघतोय मी हे ? त्यांनी आपली जागा सोडून मशिदीचा कोपरा गाठला आणि प्रार्थनेचा बहाणा केला.
पण डोळे किलकिले करून ते तिच्याकडेच पहात होते.

ख़ून-ए-कातील-ए-बे सर्-ओ-पा रा बहा-ए-खीश
मलेदान-ए-निगार-हिना रा बहाना साख़्त्

खरंतर मला रक्तबंबाळ करून तिने ते तिच्या पुस्तकातल्या पानांना फासलंय,
पण बहाणा मात्र सगळ्यांच्या समोर असा करते आहे की त्या पानांना ती प्रेमाने हिना लावत आहे.
हाही बहाणा !

शायर : मिर्झा महम्मद हसन ( कातिल )
१७५७ ते १८१८.

आणि ही गज़ल इथे ऐका.


जयंत कुलकर्णी.

शनिवार, १९ जून, २०१०

मास्टर मदन - जगाला पडलेले एक अद्‌भूत स्वप्न !

                                                मास्टर मदन (जन्म २८-१२-१९२७. मृत्यू :६-६-१९४२)

२८ डिसेंबरला परमेश्वराच्या हातून एक मोठी चूक घडली. त्या चुकीसाठी मला नाही वाटत तो स्वत:ला कधी माफ करु शकेल. या दिवशी त्याने त्याच्या विश्वातल्या एका गाणार्‍या स्वर्गिय गंधर्वाला चुकून या मर्त्य जगात पाठवले. ते साल होते १९२७. 

अवघ्या १४ वर्षाच्या आयुष्यात गायनाच्या कुठल्या पातळीवर तो पोहोचला होता ते आता आपण बघुया.

हा शापीत गंधर्व पंजाबमधल्या जालंदर लिल्ह्यातल्या एका खानेखाना नावाच्या गावात एका शीख कुटूंबाच्या घरात अवतीर्ण झाला. त्याचे नाव “मास्टर मदन”. देवाने याच्या जन्मासाठी गाव सुध्दा कसे निवडले ते बघा. हे गाव सम्राट अकबराच्या दरबारी असलेल्या नवरत्नांपैकी एक, ज्याचे नाव अब्दूल रहीम खान-ई-खान, त्याने वसवले होते. हा स्वत: मुसलमान असून कृष्णभक्त होता आणि त्याने कृष्णावर बरीच पद्ये रचली होती. या माणसावर परत केव्हातरी मी लिहीनच. याची एक हकीकत सांगतात. हा दानधर्मासाठी बराच प्रसिध्द होता. पण त्याची दानधर्म करायची पध्दत विचित्र/वेगळी होती. तो दानधर्म करताना याचकाच्या नजरेस कधी नजर द्यायचा नाही. याची त्या वेळी नजर नेहमीच खाली झुकलेली असे. हे कळल्यावर कबीराने एक दोहा त्याच्यावरही लिहीला तो असा –
देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन
लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन.
सदासर्वकाळ देणारा खरा दुसराच कोणीतरी ( दिन रैन)
मी देतो असे वाटू नये म्हणून त्याची नजर ही नेहमी झुकलेली असते. ( तासो निचे नैन).
असो. हे विषय निघाला म्हणून सांगितले.


ब्रिटीश राजवाटीत हे गाव लाकडावरील हस्तिदंताच्या कोरीव कामासाठी प्रसिध्द होते. याच गावात मदनचे आजोबा रामसींग यांनी आसरा घेतला. १९२८ साली त्या गावात त्यांनी एक छोटेसे घर बांधले त्याचे नाव त्यांनी ठेवले “मोहन निवास”. त्या गावातले बुजुर्गांच्या म्हणण्याप्रमाणे या घरात त्या गावाच्या पंचक्रोशीतले अनेक कलाकार हजेरी लावत आणी मग मैफिली रंगत. हे काही दिवसाने बंद पडले कारण मदनच्या वडिलांनी म्हणजे सरदार अमरसिंग यांनी ते गाव सोडले आणि ते सिमल्याला स्थायीक झाले. त्यांना सिमल्याला एक चांगली सरकारी नोकरी मिळाली आणि त्या कुटूंबाचा आपल्या गावाशी संपर्क तुटल्यातच जमा झाला. अमरसिंग हे स्वत: संगीताचे उत्तम जाणकार होते आणि पेटी आणि तबला उत्कृष्ट वाजवायचे. त्यांची पत्नी म्हणजे मदनची आई श्रीमती पुरणदेवी, या एक अत्यंत धार्मिक बाई होत्या आणि मदनवर झालेल्या धार्मिक संस्काराचे श्रेय त्यांनाच दिले जाते. मदनला एक मोठा भाऊही होता त्याचे नाव मोहनसिंग. या दोघात जवळ जवळ १३ वर्षाचे अंतर होते. हाही स्वत: व्हायोलीन उत्तम वाजवायचा आणि उत्तम गायचा देखील. मदनला एक मोठी बहीण होती तिचे नाव होते शांतीदेवी. ही एक उत्तम गायिका होती आणि तिनेच मदनला त्याच्या दुसर्‍या वर्षापासून गाणे शिकवायला सुरवात केली. मदनला गळ्याची आणि गाणे समजण्याची दैवी देणगी असल्यामुळे त्याने गाण्यातील बारकावे लवकरच आत्मसात केले. त्यानंतर त्याची गाणे शिकण्यासाठी पंडीत अमरनाथ यांच्याकडे रवानगी करण्यात आली. भावाबरोबर गाण्याचा रियाज़ आणि शाळेतले शिक्षण चालूच होते. जरी शाळेत तो एक हुषार मुलगा म्हणून ओळखला जायचा तरी मदन हा काहीसा अबोल, कोणात न मिसळणारा मुलगा होता. त्याचा वेष चांगला असायचा आणि अंगावर क्वचित त्या वेळेच्या प्रथेप्रमाणे दागदागीने आणि डोक्यावर चमकणारी पगडीही असायची.


याच काळात प्रसिध्द गायक सैगल हे ही सिमल्यात रेमींग्ट्न टाईपराईटर कंपनीमधे नोकरीला होते आणि ते आपली पेटी घेऊन मोहनच्या घरी बर्‍याच वेळा भेट द्यायचे आणि मदनबरोबर ते दोघे मस्त मैफिल जमवायचे. अर्थात मदन त्यावेळी फक्त ऐकायचेच काम करायचा कारण त्याचे त्या वेळेस वय होते फक्त दोन. सैगलचे या घराशी स्नेहबंध चांगलेच जुळले होते. शांतीदेवींनी त्याच्या एका काल्का ते कलकत्ता या प्रवासाची आठवण सांगितली आहे, या प्रवासभर ते गातच होते आणि सहप्रवासी त्याचा आनंद लुटत होते. सैगल यांना लहानग्या मदनबद्दल ममत्व होते आणि त्यांना त्याच्या या गाण्याच्या दैवी देणगीचे फार कौतूक होते. सैगल यांनी न्यू-थिएटर्समधे कलकत्याला नोकरी पकडली तरी पण जेव्हा जेव्हा मास्टर मदन किंवा त्यांचे कुटुंबीय कलकत्याला येत, तेव्हा त्यांची काळजी सैगलच घेत.


रेडिओ आणि चित्रपटगृहांचा नुकताच जन्म झाला होता. जाहीर कार्यक्रम हाच जनसामान्यांसाठी संगीत ऐकण्याचा मार्ग होता. त्यामुळे अशा संभांना अलोट गर्दी होत असे. खाजगी मैफिलीही होत असत पण त्या संस्थानिकांकडे. त्यातल्या त्यात उत्तरेला पतियाळा संस्थान तर दक्षिणेला म्हैसूर संस्थान हे कलाकारांचे उदार आश्रयदाते होते.


मास्टर मदनचा पहिला जाहीर कार्यक्रम १९३० सालच्या जून महिन्यात धरमपूर सॅनेटोरियम मधे झाला. त्यावेळी त्याचे वय होते अवघे साडेतीन वर्षे. जे हजर होते ते त्याच्या गायनाने अवाक्‌ झाले. त्या वेळी त्याने ध्रूपदमधे “हे शारदा नमन करू.....” हे म्हटले होते. टाळ्यांच्या कडकडाटात हजर असलेल्या इतर कलाकारांनी या आवाजाचा आणि या जगाचा काही संबंध नाही असे जाहीर केले आणि असे काही आत्तापर्यंत ऐकले नव्हते असे नमूदही केले. या कार्यक्रमाची बातमी एखाद्या वणव्यासारखी भारतात पसरली आणि या कार्यक्रमाला त्या वेळेच्या सर्व वर्तमानपत्रातही जोरदार प्रसिध्दी मिळाली. दुरवरच्या मद्रासच्या हिंदूमधे देखील त्याचे छायाचित्र छापून आले. एका रात्रीत मास्टर मदन किर्तीच्या शिखरावर पोहोचला आणि त्याला सगळीकडून कार्यक्रमासाठी बोलावणे येऊ लागले. सिमला तर त्याचे गावच होते आणि तिथल्या संस्थानिकाचा तो लाडका गायक झाला. या सगळ्याचा परिणाम असा झाला की तो एका महिन्यात सरासरी वीस कार्यक्रम करु लागला. त्या काळात त्याच्या भावाला व्हायोलीनच्या साथीसाठी ऐंशी रुपये तर त्याला २५० रुपये मिळायचे. पण मास्टर मदन हा पैशासाठी गात होता असे ना त्याचे टिकाकार म्हणत ना त्याचे मित्र म्हणत. तो गात असे कारण गाणे ही त्याची आता मानसीक गरज बनली होती. त्यातच त्याला खरा आनंद मिळायचा.


भारतातल्या घरादारात मास्टर मदनचे नाव मोठ्या आदराने घेतले जाऊ लागले. जगातले आश्चर्य म्हणून तो ओळखला जाऊ लागला. मैथिली शरण गुप्तांनी त्यांच्या भारत भारती मधेही  त्याचा उल्लेखही केलेला आपल्याला आढळेल. मास्टर मदनची त्याच्या गुरूंवर (संत नंदसिंगजी महाराज) आतोनात श्रध्दा होती. या गुरूंनी म्हणे त्याच्या अकाली मृत्यूचे भाकित करुन ठेवले होते. खर खोटे माहीत नाही, एकदा या गुरुंच्या उपस्थितीत त्याने जोनपूरी राग इतका भक्तिभावाने आळवला होता की श्रोत्यांना त्या सभेत परमेश्वर हजर असल्याचा भास होऊ लागला. तो भास किंवा आभास म्हणा मास्टर मदनने भैरवी आळवल्यावरच दूर झाला. या लहान वयात त्याची धार्मिक वृत्ती इतकी वाढली की तो आता सतत गुरु नानक यांची प्रतीमा जवळ बाळगायला लागला. एवढेच नाही तर कधी कधी झोपायच्या ऐवजी तो समाधीत जायला लागला.
रेडिओवर आता त्याचे नियमित कार्यक्रम होऊ लागले. त्याची किर्ती ऐकून मुंबईहून त्याला सिनेमाता काम करण्याची विनंती करण्यासाठी माणसे येऊ लागली. पण त्याच्या आईवडिलांनी आणि नातेवाईकांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यावेळेस सिनेमात काम करणे सभ्यपणाचे समजत नसत. याचा त्यांना पुढे फारच पश्चत्ताप झाला. कारण जर त्यांनी यासाठी परवानगी दिली असती तर त्याची चित्रफित असती आणि त्यात त्याची प्रतिमा अजरामर झाली असती.


१९४० साली महात्मा गांधी सिमल्याला गेले होते सभेसाठी. ती सभा ओस पडली कारण आख्खे सिमला मास्टर मदनच्या गाण्याला गेले होते.


मास्टर मदनचे शेवटचे गाणे कलकत्यात झाले. त्या कार्यक्रमात त्याने जवळ जवळ दीड तास राग बागेश्वरी आळवला. एका श्रोत्याने बक्षीस म्हणून लगेचच ५०० रुपये दिले- त्या काळात ही रक्कम फारच मोठी होती. परत येताना मदन दिल्लीला त्याच्या बहिणीकडे उतरला. तेथेदेखील दिल्लीच्या रेडिओ स्टेशनवर त्याला जावे लागायचेच. या छोट्याला त्याचा मेहूणा सायकलवर घेऊन अलिपोर रोडवर जायचा.
याच मुक्कामात मदनला ताप चढला. पण त्याने रेडिओ स्टेशनवर जायचे चालूच ठेवले होते. वैद्यकीय उपचारांनी ताप काही उतरायची लक्षणे दिसेनात तेव्हा त्याने सिमल्याला प्रस्थान ठेवले. या हवा बदलाचाही काही फायदा झाला नाही. काही दिवसांनी एक चमत्कारिक घटना घडली. त्याचे कपाळ आणि सांधे चमकायला लागले. तेव्हा त्याच्यावर पार्‍याचा विषप्रयोग झाल्याची शंका बर्‍याच जणांनी प्रदर्शित केली. किंवा त्याच्या नातेवाईकांच्या अती हव्यासाचाही हा परिणाम असावा. पण त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिघडतच गेली. 


या जगाचा जुन ६ रोजी त्याने निरोप घेतला. त्यावेळी साल होते १९४२.


आपल्या चुकीची दुरुस्ती “त्याने” बरोबर १४ वर्षाने केली आणी या गंधर्वाला परत बोलावून घेतले.


मास्टर मदन गेल्याला आता ७० वर्षे होऊन गेली पण त्याच्या ताकदीचा आणि संगीताची जाण असलेला गायक अजून या क्षेत्रात जन्मायाचा आहे. सागर निझामीच्या दोन गज़ला आणि काही गाणी एवढीच त्याची संपत्ती आपल्याकडे आहे. एवढी रेडिओ रेकॉर्डींग असताना त्यातले काहीही आपले सरकार मिळवू शकले नाही ही अत्यंत बेजबाबदारपणाची आणि दुर्दैवाची बाब आहे.या थोर स्वर्गिय बालगंधर्वाच्या दोन गज़ला आपण ऐकणार आहोत आणि त्याचा अर्थही समजून घेणार आहोत.


यूँ न रह रह कर हमें तरसाईये
आइये आ जाईये आ जाईये... 

फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर वही दानिस्ता ठोकर खाईये..
फिर मेरी आग़ोश में गिर जाईये


मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
मेरी दुनिया मुन्तज़िर है आपकी
अपनी दुनिया छोड़ कर आ जाईये


ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
ये हवा `सागर’ ये हल्की चाँदनी
जी में आता है यहीं मर जाये
-सागर निझामी.


दोन प्रेमी जिवांच्या मनात काय काय काय चाललेले असते हे त्यांना जन्म देणार्‍या परमेश्वरालासुध्दा कळणे मुष्कील.
कधी त्याची ओढ तर कधी त्याचा तिरस्कार. कधी अबोला तर कधी प्रेम. कधी क्षमा तर कधी नाही.
सागर काय म्हणतोय ते बघूया.


मला का सारखा तडपवतो आहेस?
ये ना ! एकदाचा ये !
मला सोडतोस, परत परत बाहेर ठोकरा खातोस, काही हरकत नाही,
माझ्या बाहूत तुझा हक्काचा आसरा आहे.


माझ्या जगात तुझी केव्हा पासून प्रतिक्षा आहे.
तुझे जग सोडून ये, माझ्या जगात ये.


नाहीतर ---
ही मदमस्त हवा, हे चांदणे,
तू नाहीस तर मला वाटते की
इथेच मरून जावे.
ही गज़ल इथे ऐका.


आता दुसरी ऐकवतो.
हैरत से तक रहा जहान\-ए\-वफ़ा मुझे
तुम ने बना दिया है मुहब्बत में क्या मुझे

हर मंज़िल\-ए\-हयात से गुम कर गया मुझे
मुड़ मुड़ के राह में वो तेरा देखना मुझे

कैफ़ ख़ुदी ने मौज को कश्ती बना दिया
होश\-ए\-ख़ुदा है अब न ग़म\-ए\-नख़ुदा मुझे

साक़ी बने हुए हैं वो `साग़र’ शब\-ए\-विसाल
इस वक़्त कोई मेरी क़सम देखता मुझे
-सागर निझामी.

माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने हे जग अवाक झाले आहे,
बघ माझ्या तुझ्यावरच्या प्रेमाने माझे काय काय झाले आहे.

माझ्या आयुष्याच्या प्रवासात माझ्या मंज़ील मधेच मी हरवलो,
या प्रवासात तुझे माझ्याकडे वळून वळून बघणे.....

बघ माझ्या अहंकाराने, बुध्दीने मी या लाटांचीच नाव केली होती...
पण मला आता शुध्द आली आहे आणि हे नाखव्या मला आता कसलेही दु:ख नाही.

सागर म्हणतो, या मिलनाच्या रात्री, ती “ते” आता साकी झाले आहेत,
यावेळी शपत, या अवस्थेत, मला कोणी बघीतले तर.....

ही गज़ल इथे ऐका.


मास्टर मदन... एक आपल्या जगाला पडलेले स्वप्न...
जयंत कुलकर्णी.

शुक्रवार, २८ मे, २०१०

दिले नादान तुझे हुआ क्या है.......


दिले नादान तुझे हुआ क्या है....
ही ग़ालीबची गज़ल माहीत नसणारा माणूस भारतात मिळणे कठीण. याचा अर्थ खरच समजवून घ्यायचा असेल तर आपल्याला सुफी संप्रदायाबद्दल थोडीशी माहीती करुन घ्यायला लागेल.
आपण ही माहीती या सारख्या गज़लेच्या आणि गालीब सारख्या कवींच्या बाबतीतच फक्त करुन घेऊ. सुफी संप्रदायावर मी लवकरच www.jayantpune.wordpress.com वर लिहीणार आहे त्यात  आपल्याला अधिक माहीती मिळेळ.

सुफी संप्रदायाच्या मते आपल्या अध्यात्माच्या प्रवासात आपल्याला सात टप्पे ओलांडावे लागतात. या प्रवासाला ते मार्ग म्हणतात आणि जो हे करायचा प्रयत्न करतो त्याला सालिक म्हणतात. हा शब्द जर एखाद्या गज़लेमधे आला तर त्याचा या दृष्टीकोनातून अर्थ जरुर लावायचा प्रयत्न करायला हवा. अशा या सालिकला परमेश्वराचे ज्ञान म्हणजे मरिफत मिळवण्यासाठी योग्य शिकवण देणे हाच सुफींचा मुख्य हेतू आहे. या प्रत्येक टप्याला मुक्कामात म्हणतात. या प्रवासात आलेल्या अनुभवांना अहवाल तर जो मार्ग अनुसरला जातो त्याला अतरिकन. फनाफिल हकीकत म्हणजे शेवट – परमात्म्यात विलीन होणे. हे सात टप्पे कोणते ?
१ "उबदियात" म्हणजे सेवा. यात पश्चाताप होतो.
२ "इष्क" म्हणजे प्रेम. या टप्प्यात परमात्म्याची ओढ लागते.
३ "जोहद" म्हणजे त्याग किंवा निवृत्ति
४ "मरिफत" म्हणजे खरे ज्ञान. यात परमेश्वर सोडून बाकी सर्व भौतिक गोष्टींचा त्याग अभिप्रेत आहे. हे ज्ञान मिळवायचे दोन मार्ग आहेत. एक इल्मी म्हणजे ग्रंथ वाचून आणि दुसरा हाली म्हणजे ध्यान-धारणेतून.
५ "वजद" म्हणजे उन्मानावस्था. यात परमेश्वराचे ध्यान करत असता उन्माद अवस्था प्राप्त होते.
हकीकत मधे साधकाच्या आत्म्याला परमेश्वराला शरण जाण्याची महती पटते. याला म्हणतात तवक्कुल तोच एकमेव सत्य आहे हे उमजणे याला म्हणताततौहिद
७ "वसल" म्हणजे मिलन. या टप्प्यावर साक्षात्कार होतो. यानंतर फ़ना व बखा म्हणजे स्वत:ला विसरुन जायचे व परमेश्वरात विलीन व्हायचे. हा श्रध्देचा उच्च बिंदू समजला जातो. याच्या नंतर परमेश्वर करेल ती पूर्व असेच समजले जाते.

मुस्लीम धर्ममार्तंडाच्या मते गायन हे निषिध्द आहे तसेच गुरुंच्या पायावर डोके ठेऊन वंदन करणे.  पण सुफींनी परमेश्वराच्या स्तुती गायनाला परवानगी दिली आणि गुरुंना वंदन करायलाही परवानगी दिली. या गायनाला म्हणतात समा आणि वंदनाला सिजदा”. त्या साठी त्यांनी एक युक्ती केली. सिजदा दोन प्रकारचा असतो हे सिध्द केले. एक सिजदा इबाद्ती आणि दुसरा ताज़िमी. पहीला हा परमेश्वरासाठी आणि दुसरा हा आदर व्यक्त करण्यासाठी.

कर्मठपणा हा मुळत: माणसाला आवडत नसल्यामुळे, मुसलमान राजांनी सुफी संप्रदायाला जो थोडाफार आश्रय दिला. पण तो त्यांच्या समाधानासाठी. सामान्य लोकांसाठी त्यांनी कर्मठ धर्माचीच कास धरलेली दिसते. असो. आता आपल्या गज़लकडे वळूया.

ग़ालीब हा सुफीसंप्रदायाचा होता त्या मुळे त्याच्या काव्यात गुढपणा पुरेपूर उतरला आहे. वरचा सामान्य अर्थ खरवडला की आत आपल्याला वरचे सात टप्पे दिसतात. बघा त्याच्या या आणि इतर काव्यात आपल्याला त्या दिसतात का ?

दिले नादान तुझे हुआ क्या है
आखिर इस दर्दकी दवा क्या है..
( हे माझ्या मना तुला काय झाले आहे ?
तुझ्या या वेदनांचे औषध काय आहे ?)

हम है मुश्ताक और वो बेजार,
या ईलाही ये माज़रा क्या है....
(इकडे तुला भेटण्याची मला तीव्र इच्छा आणि तू नाखूष, माझ्यावर रागावलेला,
हे परमेश्वरा हा मामला आहे तरी काय ?)

मै भी मुहमे जुबां रखता हूं
काश पुछो की मुदआ क्या है
(माझी पण मते आहेत,
पण खरा मुद्दा काय आहे ?) याच्यात फार गहन अर्थ दडलेला आहे.

जब की तुझबीन नही कोई मौज़ूद,
फिर ये हंगामा-ए-खूदा क्या है.
(जर सगळे तुझ्यातच सामावलेले आहेत तर
तुझ्या अस्तीत्वाबद्दल हा वाद कसला ?)

ये परी चेहरा लोग कैसे है
गमज़ा-ओ-इश्व-ओ अदा क्या है
(हे परी सारखे सुंदर लोक असे कसे आहेत,
त्यांच्या या गमजा आणि अदात काय विशेष आहे ?)

शिकन-ए-ज़ुल्फ-ए अंबारी क्या है
निगाहे-चष्म-ए सुरमासा क्या है?
(हे कुरळे केस आम माणसात एवढे प्रिय का ?
या सुरमा घातलेल्या डोळ्यात एवढे काय आहे ?)

सब्ज-ओ-गुल कहांसे आये है
अब्र क्या चिज है हवा क्या है..
(ही हिरवळ कुठून आली
आणि हे ढग, ही हवा कोणी जन्माला घातली ?)

हमको उनसे वफ़ासे है उम्मीद
जो नही जानते वफ़ा क्या है ?
(आम्हाला त्यांच्या प्रामाणिकपणाकडून अपेक्षा आहेत,
पण त्यांना प्रामाणिकपणा म्हणजे काय हे माहीती असायला पाहिजे ना !)

भला कर तेरा भला होगा
और दर्वेश की सदा क्या है ?
(चांगले कर्म कर, तुझे चांगलेच होईल
माझ्या दर्वेशीचे अजून काय आशिर्वाद असणार ?)(दारोदार हिंडणारे ते दर्वेशी. यांना समाजात चांगला मान असायचा.)

जान तुमपर निसार करता हूं
मै नही जानता दुंआ क्या है
(मी तर तुझ्यावर माझे प्राण अर्पण करायला तयार आहे,
जरी मला तुझा आशिर्वाद काय हे माहीत नाहीत तरी ही)

माना की कुछ नही ग़ालीब
मुफ्त हात आये तो बुरा क्या है......
(मानलं की मी काही विशेष नाही,
पण मी माझे ज्ञान तुम्हाला फुकट वाटतोय तर त्यात वाईट काय आहे ?
तुमचा तोटा काय आहे ?)
दिले नादां तुझे हुआ क्या है.......
साध्या अर्थासाठी -

Get this widget | Track details |         eSnips Social DNA

गुढ अर्थासाठी ऐका -

Get this widget | Track details |         eSnips Social DNA

आवडला हा भावार्थ तर जरूर कळवा.
जयंत कुलकर्णी.